दिवस 1: पुणे - थेऊर - मोरगाव - सिद्धटेक (160km)
पहिल्या दिवशी मी थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेक कव्हर करायचे ठरवले. सायकलिंगचे अंतर लक्षात घेता मी पारंपारिक सीक्वेन्स वगळले. पहिला दिवस पहाटे ५ वाजता सुरू झाला. माझे कुटुंबीय आणि सासु-सासरे मला भेटायला आले.
अष्टविनायक on Cycle |
पहिले 30 किमी 1:30 तासांपेक्षा कमी वेळात कापून थेऊरला पोहोचलो. कमी गर्दीमुळे मी पटकन दर्शन घेतले. हे मंदिर फार पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. सध्या असलेले मंदिर हे मोरया गोसावी यांनी बांधले. चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडित आहेत. देवळाचे महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे. श्री चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस या देवळात व्यतीत केले आणि गणपतीचे नांव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे.
पुण्यातील काही सायकलस्वार भेटले जे त्यांच्या वीकेंड राईडसाठी आले होते. काही वेळ गप्पा झाल्याआणि सर्व आश्चर्यचकित झाले कारण मी कोणत्याही आधाराशिवाय सोलो राईड करत आहे. त्यांनी मला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि मग मी तेथून निघून गेलो.
थेऊर - श्री चिंतामणी |
यवतला पाशी नास्ता केला व पुढचा प्रवास चालू ठेवला. चौफुला मार्गे सुपे करता मोरगाव गाठले. प्रचंड गर्दी होती पण सासऱ्यांच्या मित्रांनी तेथील गरुजींना निरोप दिला होता म्हणून डायरेक्ट दर्शन झाले हेतू एकाच कि पुढील सायकल चा प्रवासा करता वेळ मिळावा. अष्टविनायकांमध्ये सगळ्यात पहिले मंदिर आहे मोरेश्वर. अष्टविनायक यात्रेची सुरुवात येथूनच होते. मंदिराच्या चारही दिशांना जाण्यासाठी द्वार आहेत पण मुख्य द्वार उत्तरमुखी आहे. प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे. मंदिरात प्रवेश करताच सहा फुटी उंच दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते. नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपतीसमोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे. या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंड ही डावीकडे वळलेली असून गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे जडवलेले आहे. मंदिरात रिद्धी (बुद्धी) आणि सिद्धी (क्षमता) यांच्यासुद्धा मुर्त्या आहेत.
मोरेश्वर मंदिर |
नीट दर्शन घेऊन मग सिद्धटेक कडे निघालो. ऊन प्रचंड जाणवत होते म्हणून 1 वाजता जेवणाचा ब्रेक घेतला व तास भर थांबून हळू हळू पुढे सरकत राहिलो. एकतर एकटा सायकल वर शिवाय भरपूर ऊन व त्यात रास्ता पण एकदम कमी रहदारीचा त्यामुळे जरा कंटाळा येत होता पण सिद्धटेक ला सूर्यास्ता आधी जायचे म्हणून वेग वाढवला. ६ ला मंदिरात पोहचलो आणि सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. काहीच गर्दी नसल्याने हवा तसा वेळ मंदिरात मिळाला.
अष्टविनायक on Cycle |
सिद्धिविनायक मंदिर भीमा नदी च्या काठी आहे. हे मंदिर एका छोट्या टेकडीवर आहे जिला सिद्धटेक म्हंटले जाते. सिद्धिविनायक देवळातील मूर्ती ही स्वयंभू असून ती तीन फुट उंच आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड ही उजवीकडे आहे. अष्टविनायकांपैकी हा एकच गणपती आहे ज्याची सोंड उजवीकडे आहे. १८व्या शतकात देवी अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून सध्याचे मंदिर उभारले. श्रींच्या डाव्या उजव्या बाजूला जय विजयाच्या मोठ्या मूर्ती आहेत.
सिद्धिविनायक मंदिर |
भीमा नदी पलीकडे खूप सारे स्टॉल आहेत जिथे छान भाकरी-पिठले-भाजी अशी थाळी मिळते. पोटभर खाऊन मग हॉटेल ला मुक्काम केला. सर्व ठिकाणी छान भक्त निवास आहे पण मी नाही राहिलो कारण मला सायकल रूम मध्ये हवी होती (त्यावर लावलेली बॅग सतत काढघाल करणे शक्य नाही होत ) तर सायंकाळी गरम पाणी नव्हते (घामात न्हाऊन आल्यावर गरम पाणी must ). हॉटेल माझ्या अटीना तयार होयचे. रस्ते एकदम छान होते. 160km करून लवकर झोपलो.
दिवस 2: सिद्धटेक ते रांजणगाव (80 km)
आजची राईड जरा कमी अंतराची होती म्हणून ७ ला हॉटेल सोडले. दौंड मार्गे प्रवास चालू केला. सगळीकडे फक्त उसाची शेती. सकाळी गारवा खूप पण आसपासची शेती आणि निसर्ग पाहत राईड छान चालू होती. एका गावात कॉफी व ब्रेड असा नाश्ता उरकला. आजच्या route ला खूप लहान लहान गावे होती. पेडगाव , काष्टी , इनामगाव , न्हावरे करत राजणगावला 2 वाजता पोहचलो. लहान गावे असल्यान, नास्ताला पर्याय मोजके होते पण खास काही अडचण नाही आली.
तस गावांमधून जाताना अनेक गावकरी थांबवून भरपूर प्रश्न विचारतात. त्यात मी रोड बाईक सायकल वर (म्हणजे सिनेमात दाखवतात तश्या रेसिंग वाल्या) त्यामुळे त्यांना जास्त कुतूहल. मी पण त्याच्या प्रश्नांना पूर्ण respect देऊन त्यांच्याशी गप्पा मारायचो. गप्पा हे पण कारण असायचे प्रवासला विलंब व्हायला. असो. मी सारे एन्जॉय करत होतो. (लोकांचे प्रश्न व गप्पांचे किस्से वेगळ्या पोस्ट मध्ये लवकरच लिहीन)
रांजणगावच्या महागणपती हे प्रवेशद्वार सर्वांचे लक्ष वेधून घेते व तिथे फोटो न काढता जाणे शक्य होत नाही. नुकतीच एकादशी झाल्याने वारकरी परतीच्या प्रवासात या गणरायाचे दर्शन घेतात म्हणून इथे पण प्रचंड गर्दी होती. इथे पण सासऱ्यांच्या खास मित्रांनी व्यवस्था केली.. दर्शन वेळेत झाले व तिथे महाप्रसाद घेतला.
रांजणगावच्या महागणपती प्रवेशद्वार |
हे पूर्वाभिमुख मंदिर अशा प्रकारे बांधलेले आहे की दक्षिणायनात सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. गणपती कमळावर बसलेला असून रिद्धी-सिद्धी त्याच्या सोबत आहेत. हा गणपती स्वयंभू आहे. ही स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख आहे. गणपती मांडी घालून कमळावर आसनस्थ आहे. त्याचे कपाळ एकदम रुंद असून त्याची सोंड डावीकडे आहे. हा महागणपती अतिशय शक्तिशाली असून से म्हणतात की त्रिपुरासुराबरोबर युद्ध करण्याआधी शंकराने गणपतीची इथे आराधना केली होती. गणेशउत्सवात रांजणगांवचे गावकरी आपापल्या घरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करीत नाहीत. तर या देवळात येऊन पूजा आणि प्रार्थना करतात.
रांजणगाव महागणपती |
पुढील प्रवास करणे शक्य होते पण मी पायांना विश्रान्ती देयचे ठरवून हॉटेल शोधले. सायंकाळी मंदिरात जरा वेळ घालवला व जेवण करून झोपलो.
दिवस ३: रांजणगाव - ओझर - लेण्याद्री व मुक्काम माळशेज (११०km)
सकाळी ६:३० वाजता सायकलचे पायडल चालू केले. आता रस्ता हळू हळू चढणीचा जाणवू लागला होता. कार/बाईक वर असे चढ आपण गृहीत पण धरत नाही पण पठारावरील चढण सायकलवर जाणवतात. वाटेत कवठे गावात मस्त नाश्ता झाला. प्रवास कवठे , राजनी , नायणगाव करत ओझर गाठले.
पहिल्या 4 गणपतीच्या तुलनेत काहीच गर्दी नव्हती (आता weekdays चालू झाले होते) यामुळे अगदी शांतपणे दर्शन घेता आले तर मंदिरात बसून नामस्मरण करणे शक्य झाले. एकूणच मला ओझर चा परिसर आवडला. स्वच्छता, उत्तम भक्त निवास, नीटनेटका परिसर पाहून प्रसन्न वाटले.
विघ्नेश्वर गणपती, ओझर |
पुणे-नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यात कुकडी नदीच्या काठी हे मंदिर आहे. येथे गणपतीने विघ्नासुर राक्षसाला पराभूत केले म्हणून त्याला विघ्नेश्वर असे म्हणतात. विघ्नेश्वराचा अर्थ विघ्नांना दूर करणारा असासुद्धा होतो. पहिले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिराच्या कळसाला सोन्याने मढविले. मंदिराच्या पूर्ण परिसराच्या चहुबाजूला भिंत आहे आणि एक विशाल प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या आवारात दोन उंच दीपस्तंभ आहेत. पूर्वाभिमुख गणपतीची सोंड डावीकडे आहे आणि त्याचे डोळे माणिकाचे आहे. रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्त्या गणपतीच्या आजूबाजूला आहेत. गणपतीच्या मुर्तीच्यावर शेषनाग आणि वास्तुपुरुष आहेत. मंदिर २० फुट लांब असून मंदिराचा मुख्य हॉल १० फुट लांब आहे.
दर्शनानंतर उसाचा रस घेऊन लेण्याद्रीचा रस्ता पकडला. रस्ते उत्तम आहेत. ओझर - लेण्याद्री १५km मार्गात गिरिजात्मज गणपती डोंगर दिसत राहतो.१:३० ला पायथा गाठला. शेवटचे २km म्हणजे नुसते चढण जे पुरेपूर थकवते. पायथ्याला पोहचून प्रथम 2 ग्लास लिंबू सरबत पिऊन जीव शांत केला. सायकल लावून मग चढाई सुरु केली. सायकलिंग चालू असल्याने लेण्याद्रीच्या पायऱ्या पण चढत जाताना चांगलाच दम निघत होता. दर्शनाची ओढ लागण्याने न थांबता वर पोहोचलो.
At लेण्याद्री |
लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. मंदिर पर्वतावर असून ते १८ गुहा असलेल्या एका बौद्ध गुहांच्या संकुलात स्थित आहे. हे गणेश मंदिर ८ व्या गुहेत आहे. या मंदिरापर्यंत पोचण्यास ३०० पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. या मूर्तीची सोंड डावीकडे आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत. मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडित आहेत. हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनविले गेले असल्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही.
काहीच गर्दी नसल्याने व्यवस्तिथ दर्शन झाले. बाहेर किती पण गरम असले तरी लेण्यांमध्ये कमालीचा गारवा होता. जरा वेळ नामस्मरण करून मग डोंगर उतरलो. खाली येऊन जेवण केले. जेमतेम ३ वाजल्याने, माझा प्रवास पुढे सुरु करायचा विचार होता. मित्र अद्वैतशी फोनवर तशी चर्चा केली व माळशेजला जाऊन राहायचे ठरवले. सायकल प्रवास चालू केला. माळशेज अगोदर गणेशखिंड घाट होता. हा घाट म्हणजे एक अग्निपरीक्षा होती. तीव्र चढाई हळू हळू पार करत एकदाचा वर पोहचलो. गणेशखिंड उतरून जाई पर्यंत ६ वाजले. देवेंद्र नावाचे एक हॉटेलला मुक्काम ठरवला . दमछाक झाल्याने लवकर जेवण करून झोपलो.
At माळशेज. Ashtavinayak on cycle |
दिवस 4: माळशेज - महड - पाली (१६७ km)
घाटमाथ्यवर डोंगराच्या कुशीत असल्याने हाड गोठवणारी थंडी होती व त्यात उजेड पण जरा उशिरा आल्याने ७ वाजता सायकल प्रवास चालू केला. एक छोटा घाट चढला कि बराचसा उतारच. माळशेजमध्ये रस्ता मोठा करणे, सिमेंट रस्ता बनवणे चालू होते म्हणून हवा तसा वेग न घेता सावकाश घाट उतरलो. सह्याद्रीचे रूप कॅमेरात टिपत पुढे जात राहिलो. एकटा असल्याने स्वतःचे फार काही फोटो काढायला नाही जमले वर रहदारी तर फारच तुरळक होती.
घाटमाथ्यवर डोंगराच्या कुशीत असल्याने हाड गोठवणारी थंडी होती व त्यात उजेड पण जरा उशिरा आल्याने ७ वाजता सायकल प्रवास चालू केला. एक छोटा घाट चढला कि बराचसा उतारच. माळशेजमध्ये रस्ता मोठा करणे, सिमेंट रस्ता बनवणे चालू होते म्हणून हवा तसा वेग न घेता सावकाश घाट उतरलो. सह्याद्रीचे रूप कॅमेरात टिपत पुढे जात राहिलो. एकटा असल्याने स्वतःचे फार काही फोटो काढायला नाही जमले वर रहदारी तर फारच तुरळक होती.
घाट उतरून झाल्यावर मग खरा खेळ चालू झाला. मोरोशी नंतर पुढे ३०-३५ km चा रस्ता सतत चढ - उतारांचा ज्यात चांगलीच दमछाक होत होती. मजल - दरमजल करत म्हसा मार्गे कर्जतकडे वाटचाल चालू केली. दुपारी निसर्ग ढाबा नावाच्या प्रसिद्ध हॉटेल मध्ये जेवलो. हॉटेल मासाहारी करता प्रसिद्ध तर मी शाकाहारी जेवण केले जे छांन होते. जास्त करून मी पूर्ण प्रवासात भाकरी भाजी किंवा खिचडी असे जेवण करायचो.
माळशेज घाट |
पुढील टप्पा बराचसा सपाट असल्याने कमी त्रासात सायकल प्रवास चालू राहिला. महडला ४:३० - ५ वाजता पोहोचलो. साधसुधं मंदिर व एकदम कमी गर्दीमुळे शांतता जाणवत होती. अगदी गाभाऱ्यात जाऊन वरद विनायकाचं दर्शन घेणे शक्य झाले. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. मूर्ती शेंदुराने माखलेली असून तिची सोंड डावीकडे आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्त्या दिसतात आणि मग गणपतीच्या दोन मुर्त्या. या मुर्त्या पूर्वाभिमुख आहेत. मंदिराच्या चारी बाजूला ४ हत्तींचे पुतळे आहेत.
गुरुजींना मी एकटा सायकलवर अष्टविनायक करत असल्याने खूप कौतुक वाटले व दर्शनानंतर 2 गुरुजींनी मला कॉफी नाश्ता करता जवळील हॉटेलात नेले. थोड्या गप्पानंतर मग मी निरोप घेतला व पाली कडे मार्गस्थ झालो. मी या पूर्ण प्रवासात एकटा असल्याने ६ नंतर प्रवास करायचा नाही हे ठरवले होते पण आजच बल्लाळेश्वराच दर्शन घेऊन अष्टविनायक यात्रा पूर्ण करायची ओढ लागली. १२५km चा आजचा प्रवास झाला होता तरी थकवा बाजूला सारून पूर्ण ताकदीने पायडल मारणे चालू ठेवले. लवकर अंधार पडला व सायकल लाईटच्या उजेडात प्रवास सुरु ठेवत ७:३० ला पाली गाठले.
बल्लाळेश्वर मंदिर |
लगेच दर्शनाला मंदिरात पोहोचलो व बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. एक अभूतपूर्ण शांतात मनाला लाभली. 2 वर्षांपासून सायकलवर अष्टविनायक पूर्ण करायचा प्रण आज पूर्ण केला. प्रवासत कोणतेच विघ्न न आल्याने विघ्नहर्ताचे आभार मानले. गुरुजीनी पण विचारपूस केली व यात्रा पूर्ण झाली म्हणल्यावर आरतीला थांबायला सांगितले. आरती करून थोडा वेळ मंदिरातच बसून राहिलो. सर्व गुरुजीसोबत खूप गप्पा झाल्या. मंदिरात गर्दी काहीच नव्हती. ८:३० होऊन गेले तरी मंदिरातून पाय बाहेर पडत नव्हते. ज्या ध्येयानी यात्रेला निघालो होतो ते पूर्ण झाले म्हणल्यावर काय करावे सुचत नव्हते.
एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची पूर्वाभिमुख मूर्ती स्थित असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे. मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी चामरे धरलेले दिसून येतात. मूर्तीचे डोळे आणि बेंबी हिरेजडीत आहे. हिवाळ्यात दक्षिणायनात सुर्याद्याच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. मूळ लाकडी मंदिराचा जीर्णोद्धार करून १७८० साली सध्याचे दगडी मंदिर बांधण्यात आले. मंदिराच्या आवारात एक विशाल घंटा आहे. ही घंटा पहिले बाजीराव यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांवर विजय मिळवल्यानंतर अर्पण केली होती.
जरा वेळानी बाहेर पडून राहायची सोय केली. खूप दमलो असलो तरी भूक नव्हती किंबहुना दर्शनांनी मन तृप्त झाले होते म्हणून काही खावेसे वाटत नव्हते. नुसता ज्यूस घेऊन हॉटेल मध्ये आराम केला. आता उद्या परतीचा प्रवास!!!
दिवस 5: पाली - पुणे (130 km)
खऱ्या अर्थाने कालच अष्टविनायक यात्रा संपन्न झाली होती त्यामुळे आज पाली ते पुणे प्रवास करून घर गाठणे हा उद्देश. आज जरा उठायला उशीर झाला व हॉटेल ८ ला सोडले. पुनः एकदा बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले व परतीचा प्रवास चालू केला. वाटेत नाश्ता केला व 11 पर्यंत खोपोली गाठले.
आता मोठे आव्हान म्हणजे बोर घाट (खंडाळा घाट) चढणे. Old highway ने घाट चालू केला. एकदम खडे चढण पुरता घाम काढत होता. हळू हळू सायकल चालवत व मध्ये मध्ये ब्रेक घेत 2 तासात घाट सर केला. सहसा इतका वेळ लागत नाही मला हा घाट चढायला पण 4 दिवस सायकल चालवून मग घाट चढणे कठीण जात होत. लोणावळ्यात मॅप्रो गार्डन मध्ये खाणे व ice-cream with cream चे टार्गेट ठेऊन प्रवास चालू ठेवला.
At Khandala after Climb |
मॅप्रो मध्ये जेवण व जरा आराम करून पुढे निघालो. लोणावळा ते पुणे रस्ता सायकल करता नेहमीचा असल्याने फार त्रास जाणवला नाही. जसे जसे पुणे जवळ येयला लागले तसा वेग घराच्या ओढीने अधिक वाढला. हिंजवडी नंतर ट्रॅफिकचा सामना करत ७ च्या आत घर घातले.
घरच्यांनी ओवाळून स्वागत केले तर मित्र परिवार केक घेऊन आले होते. एकूण ६४४ किलोमीटर प्रवास एकट्याने 5 दिवसात ८ गणपतीचे दर्शन घेऊन पूर्ण केला.
!! गणपती बाप्पा मोरया !!
Ashtavinayaka on cycle |
!! गणपती बाप्पा मोरया !!
Pritesh Kulkarni
Pune
सुंदर वर्णन केले आहेस सर्व प्रवासाचे. Indeed !!
ReplyDeleteGreat to see you again
ReplyDeleteबऱ्याच वर्षांनी ब्लॉग आला मित्रा. वाचून मजा आली. तुझे कोकणचे अनेक ब्लॉग रेफरन्स म्हणून वापरले आहेत आमची ट्रिप ठरवायला.
ReplyDeleteGreat Journey
ReplyDelete