Saturday, 9 May 2026

पुणे ते गणपतीपुळे (Via कोल्हापूर – अणुस्कुरा) solo सायकलिंग - – सह्याद्रीतून समुद्रापर्यंत…

 २०२४ मध्ये मी गणपतीपुळेपर्यंतचा सोलो सायकलिंग टूर केली होती. त्या वेळी माझा रूट ताम्हिणी घाट आणि दापोलीमार्गे होता. पण २०२५ मध्ये पुन्हा गणपतीपुळेला जायचं ठरवलं तेव्हा यावेळी वेगळा रस्ता अनुभवायचा होता. त्यामुळे मी सावर्डे (तासगावजवळ) – कोल्हापूर – आंबा बाजूने अनस्कुरा घाट असा रूट निवडला. या रूटमुळे अंतर ३००+ किमी ऐवजी ५००+ किमी झाले, पण सावर्डे येथील कुलदेवीचे दर्शन, कोल्हापूर भेट आणि निसर्गाने भरलेला प्रसिद्ध अनस्कुरा घाट अनुभवायला मिळाला. त्यातच गावखडी ते गणपतीपुळे हा समुद्रकिनाऱ्यालगतचा सुंदर राईड अनुभवता आली.

हा ५००+ किमीचा सोलो सायकलिंग प्रवास फक्त अंतर पूर्ण करण्यासाठी नव्हता, तर नवीन रस्ते, निसर्ग, लोक आणि स्वतःला पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी होता.

यावेळी या सोलो सायकलिंग प्रवासासाठी माझी शारीरिक तयारी तितकी चांगली नव्हती, कारण सरावासाठी फारसा वेळ मिळाला नाही. पण मानसिकदृष्ट्या मात्र मी पूर्णपणे तयार होतो. या रूटवरील बहुतांश भागाला मी आधी अनेकदा कारने भेट दिली असल्यामुळे रस्ता, घाट आणि भूभागाची चांगली कल्पना होती, त्यामुळे terrain ची फारशी चिंता नव्हती. प्रवास सुरू करण्यापूर्वी रूट, elevation, रोजचा प्रवास, तसेच मुक्कामाच्या ठिकाणांची नीट माहिती आणि planning केली. सगळं विश्लेषण करून शेवटी २० डिसेंबर ही तारीख प्रवासासाठी निश्चित केली आणि पुन्हा एकदा सायकलवरून नवीन आठवणी तयार करण्यासाठी सज्ज झालो.


२० डिसेंबर २०२५ - दिवस : पुणे ते कराड – (160Km)

पहाटे :३० वाजताचा गजर वाजला आणि प्रवासाची सुरुवात :३० झाली. पुण्याच्या थंडगार वातावरणात सायकलवर बसताना अंगात एक वेगळीच ऊर्जा होती. तांबडं फुटायला लागलं असताना मी कात्रज बायपास घाट चढायला सुरवात केली. अनेकदा इथे सराव केल्याने घाट सहज पार पडला मग पुढे नुसता उतार असल्याने वेग पकडत कापूरहोळ गाठले. सकाळी साधारण १० वाजेपर्यंत मी शिरवळला पोहोचलो. डिसेंबर महिना असल्यामुळे अजूनही हवेत गारवा जाणवत होता. तिथे एका छोट्या हॉटेलमध्ये नाश्ता आणि गरम कॉफी घेतली. थोडा वेळ आराम करून पुढचा प्रवास सुरू केला. आता समोर होता खंबाटकी घाट. हवामान थंड असल्यामुळे चढ सहज झाला आणि अवघ्या ४५ मिनिटांत घाट माथ्यावर पोहोचलो. वर काही फोटो काढले आणि मग काळजीपूर्वक पण वेगात घाट उतरण्याचा आनंद घेतला. घाटातील वळणांवर सावधपणे सायकल नियंत्रित करत खाली उतरताना जोश वेगळ्याच पातळीवर होत.

खंबाटकीनंतर साताऱ्यापर्यंतचा रस्ता सतत rolling terrain होता. सकाळचा गारवा आता कमी होत गेला आणि उन्हाची तीव्रता जाणवू लागली. दुपारपर्यंत सातारा गाठलं. साताऱ्यातील लांब आणि चढ असलेले फ्लायओव्हर पार करताना थोडा दम लागत होता, विशेषतः इतकं अंतर पार केल्यानंतर. दुपारी साधारण १:३० नंतर एका रस्त्यालगतच्या हॉटेलमध्ये थांबून व्हेज थाळीवर ताव मारला. गरम जेवणामुळे शरीराला पुन्हा ऊर्जा मिळाली. तिथेच २०-२५ मिनिटं आराम करून पुन्हा प्रवास सुरू केला. पण आता पुढचा प्रवास थोडा कठीण वाटू लागला. कडक उन्हात एकट्याने सायकल चालवणं थकवणारं होतं. तरी steady pace ठेवत उंब्रजपर्यंत पोहोचलो. हेल्मेटखाली घाम, अंगात थकवा, आणि अजून बरंच अंतर बाकी. इथेच खरी परीक्षा होतीथांबायचं की पुढे जायचं? मी स्वतःला सांगितलं – “थोडं थोडं कर, पण थांबू नकोस.”

संध्याकाळ जवळ येत होती आणि सूर्य मावळतीकडे झुकू लागला तसं पुन्हा हवामान साथ देऊ लागलं. गारवा वाढल्यामुळे वेग वाढवता आला आणि शेवटी नियोजनाप्रमाणे कराड गाठलं. त्या दिवसात एकूण १६० किमी अंतर पूर्ण झालं होतं. ठरवल्याप्रमाणे संध्याकाळी ६ वाजण्यापूर्वीच कराडला पोहोचलो. कराडमध्ये मी हॉटेल संगममध्ये मुक्काम केला. फ्रेश होऊन थोडा आराम केला आणि नंतर शांतपणे रात्रीचं जेवण घेतलं. दिवस खूपच थकवणारा होता, पण नियोजनानुसार अंतर पूर्ण केल्याचं समाधान मनात होतं. उद्या सकाळी पुन्हा ६ वाजता राईड सुरू करायची असल्यामुळे रात्री १० वाजताच झोपलो.



२१ डिसेंबर २०२५ - दिवस : कराडतासगावसावर्डे (कुलदेवी दर्शन) – कोल्हापूर

दुसऱ्या दिवशी उठताना शरीर दुखत होतं. पाय जड झाले होते. पण प्रवास थांबवायचा नव्हता. हलका स्ट्रेचिंग करून पुन्हा सायकलवर बसलो. कराडहून तासगावच्या दिशेने निघालो. आजचा रूट कराडतासगावसावर्डेकोल्हापूर असा होता. हा भाग तुलनेने सपाट होता, त्यामुळे सायकल चालवायला मजा येत होती. ऊसाची शेतं, गावातले वातावरण आणि रस्त्याच्या कडेला खेळणारी मुलं, शेतकऱ्यांची लगबग, उसाची तोडणी  सगळं खूप छान वाटत होतं. रस्त्यावरच्या लोकांनीकुठं चाललात?” विचारलं कीगणपतीपुळेम्हणताच त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि कौतुक दिसायचं. तासगाव गाठल्यावर सावर्डे गावाकडे वळलो. सावर्डेकडे जाताना मनात वेगळीच उत्सुकता होती, कारण हे आमच्या कुलदेवीचं गाव आणि आमच्या पूर्वजांशी जोडलेलं ठिकाण होतं.



सावर्डे गावात पोहोचल्यानंतर कुलदेवीचं दर्शन घेतलं. त्या शांत आणि प्रसन्न वातावरणात काही वेळ घालवल्यावर पूर्ण प्रवासाचा थकवा कमी झाल्यासारखा वाटला. थोडा आराम केल्यावर शरीर आणि मन दोन्ही पुन्हा fresh झालं. प्रवासात देवाचं दर्शन घेणं म्हणजे एक मानसिक आधार मिळाल्यासारखं वाटतं. गावातील काही स्थानिकांशी गप्पा मारण्याची संधी मिळाली आणि तो अनुभव खूप खास होता. मी पुण्याहून सायकलवर आलोय हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं. त्यात जेव्हा मी सांगितलं की आमच्या - पिढ्या मागचे पूर्वज या भागातील होते, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आपलेपणा खूप भावला. “आपल्या गावाशी नातं असलेला माणूस भेटतोयही भावना त्यांच्या बोलण्यात स्पष्ट जाणवत होती. त्या छोट्याशा भेटीत एक वेगळीच भावनिक जोड निर्माण झाली.


स्थानिकांशी चर्चा करून आणि थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने प्रवास सुरू केला. दुपारी साधारण वाजता आष्टा गावात जेवणासाठी थांबलो. चांगलं जेवण मिळाल्यामुळे थोडी ऊर्जा परत मिळाली. मात्र त्या दिवशी स्थानिक निवडणुकांचे निकाल लागले असल्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी विजय मिरवणुका सुरू होत्या. ढोल-ताशे, रंग आणि मोठी गर्दी यामुळे प्रवास थोडा संथ होत होता. पण एक गोष्ट विशेष जाणवलीजवळपास प्रत्येक ठिकाणी स्थानिकांनी मला सायकलसाठी जागा दिली आणि मुद्दाम रंग उडवणं टाळलं. त्यांच्या त्या समजूतदारपणामुळे प्रवास अधिक सहज झाला.

आष्टा ते कोल्हापूर हा टप्पा मात्र खूप कठीण वाटला. रस्ता पूर्णपणे सपाट असूनही कडक ऊन, शरीरातील वेदना आणि एकट्याने सतत सायकल चालवण्याचा मानसिक थकवा यामुळे pace मंदावला होता. मध्ये मध्ये छोटे breaks घेत, पाणी पित आणि स्वतःला motivate करत पुढे जात राहिलो. शेवटी राष्ट्रीय महामार्ग लागल्यानंतर थोडा confidence वाढला. आता कोल्हापूर फक्त २५ किमीवर आहे हे कळल्यावर अचानक ऊर्जा परत आली आणि वेगही वाढलासंध्याकाळी कोल्हापूरमध्ये पोहोचलो. आजचा मुक्काम राजारामपुरी येथे मामांच्या बंगल्यावर होता. पण तिकडे जाण्यापूर्वी महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गेलो. रविवार आणि डिसेंबर असल्यामुळे मंदिर परिसरात प्रचंड गर्दी होती. त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं आणि नंतर मामांच्या घरी गेलो.


दिवसभरात साधारण १३५ किमी अंतर पूर्ण झालं होतं. घरी गेल्यावर मामींनी बनवलेलं घरगुती जेवण मिळालं आणि दिवसभराचा थकवा काही प्रमाणात कमी झाला. रात्री सगळ्यांसोबत गप्पा मारत दिवसातील अनुभव शेअर केले आणि मग रात्री १० वाजता झोपलो. उद्या घाटाचा टप्पा असल्यामुळे थोडं उशिरा, सकाळी ते :३० दरम्यान प्रवास सुरू करायचं ठरवलं.


२२ डिसेंबर २०२५ - दिवस : कोल्हापूरकळेअनुस्कुरा घाटआडिवरे (100km)

तिसऱ्या दिवशी सकाळी कोल्हापूरमधून थोडं उशिराच, साधारण ते :३० वाजता प्रवासाला सुरुवात केली. मामांच्या घरी मिळालेला पौष्टिक घरगुती नाश्ता शरीरासाठी आणि मनासाठी दोन्हींसाठी उत्तम ऊर्जा देणारा होता. कोल्हापूर सोडण्यापूर्वी रंकाळा तलावाला भेट दिली. सकाळच्या वेळेत अनेक स्थानिक लोक चालणे, व्यायाम आणि गप्पांसाठी तलाव परिसरात आले होते. शांत पाणी, सकाळचा गारवा आणि स्थानिक जीवनाची ती झलक खूप सुंदर वाटली. काही फोटो काढून पुन्हा सायकलवर बसलो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.

काळे गावापर्यंतचा प्रवास खूप आनंददायी झाला. सकाळच्या वेळेत सायकल चालवत असताना गावाकडचं साधं पण सुंदर जीवन अनुभवायला मिळत होतं. कुठे शेतात काम सुरू होतं, कुठे चहाच्या टपरीवर गप्पा रंगल्या होत्या, तर कुठे लहान मुलं शाळेकडे जाताना दिसत होती. अशा वातावरणात सायकलिंग करणं म्हणजे प्रवासापेक्षा अनुभव जास्त वाटत होता.

मात्र काळे गावाजवळ अचानक सायकलच्या टायर पंक्चर झालं. सायकल रस्त्याच्या कडेला लावली आणि सर्व tools spare tube बाहेर काढून पंक्चर दुरुस्त करायला सुरुवात केली. जवळपास ३० मिनिटं त्यात गेली. पुन्हा प्रवास सुरू केला, पण अवघ्या - किमी अंतरावर पुन्हा त्याच टायरला पंक्चर झालं. त्या क्षणी थोडी चिडचिड झाली. तरीही शांतपणे दुसरी spare tube वापरून पंक्चर ठीक केलं. आता मात्र माझ्याकडे spare tube नव्हती, म्हणजे पुढे आणखी एक पंक्चर झालं असतं तर संपूर्ण सायकलिंग टूर थांबण्याची शक्यता होती. त्यामुळे पुढे एखादं गाव किंवा दुकान मिळतंय का हे सतत पाहत होतो. शेवटी बाजार भोगाव येथे एक पंक्चर दुकान दिसलं आणि जीवात जीव आला. तिथल्या माणसाने लगेच मदत करत दोन्ही tubes दुरुस्त करून दिल्या. त्यानंतर पुन्हा निर्धास्तपणे प्रवास सुरू केला.

अनस्कुरा घाटापर्यंतचा रस्ता जंगलातून जाणारा होता. घाट सुरू होण्याआधीच सतत येणारे छोटे climbs संयम आणि ताकद दोन्हींची परीक्षा घेत होते. प्रत्येक चढ संपला कीआता घाट सुरू होईलअसं वाटायचं, पण पुढे पुन्हा एक चढ समोर यायचा. काही किलोमीटरनंतर अखेर अनस्कुरा घाट सुरू झालाअनस्कुरा घाट हा या संपूर्ण प्रवासातील सर्वात सुंदर भागांपैकी एक होता. अनुस्कुरा घाट म्हणजे सह्याद्रीचं खरं सौंदर्य. घनदाट जंगल, थंड हवा, आणि सतत चढणारा रस्ता. प्रत्येक पेडल मारताना शरीराला ताण जाणवत होता, पण आजूबाजूचं दृश्य सगळा थकवा विसरवत होतं. मध्येच एखाद्या ठिकाणी थांबून पाणी पिणं, फोटो काढणं आणि थोडा वेळ शांत बसणंहे सगळं प्रवासाचा भाग बनलं होतं. लांब वळणावळणाचे रस्ते, गुळगुळीत रोड, सह्याद्रीच्या रांगांचे अप्रतिम दृश्य आणि सभोवताली दाट हिरवळसगळंच अविस्मरणीय होतं. घाट उतरताना वेग, वारा आणि निसर्ग यांचं एक सुंदर मिश्रण अनुभवायला मिळत होतं. मध्ये मध्ये काही ठिकाणी थांबून निसर्गाचं ते अप्रतिम सौंदर्य डोळ्यात साठवून घेतलं.




घाट संपल्यानंतर राजापूरकडे जाणारा रस्ता थोडा आव्हानात्मक होता. रस्त्याची अवस्था फार चांगली नव्हती, पण सभोवतालची हिरवळ आणि सतत वळण घेणारे रस्ते पुढे जाण्याची प्रेरणा देत होते. काही वेळाने मुंबई-गोवा महामार्ग लागला आणि तिथे राईडचा वेग पुन्हा वाढवता आला. रुंद आणि गुळगुळीत रस्ता, मध्ये मधे छोटे climbs आणि घाट उतारयामुळे पुन्हा राईडच मजा येऊ लागली. राजापूरजवळ आल्यावर राजापूर बायपास घेत पुढचा प्रवास सुरू ठेवला.

कोकण भागातील रस्ते म्हणजे सतत सहनशक्तीची परीक्षा घेणारे. दिवसभर सायकल चालवल्यानंतर शरीर पूर्णपणे थकलं होतं, पण अजून ३० किमी अंतर बाकी होतंआजचं मुक्कामाचे ठिकाण होतं आडिवरे गाव. प्रत्येक चढ खूप exhausting वाटत होता, पण वर पोहोचल्यानंतर दिसणारे सह्याद्रीचे नजारे पुन्हा नवीन ऊर्जा देत होते. मार्गात डोंगरांच्या मागे मावळणारा सुंदर सूर्यास्त पाहायला मिळाला आणि त्या क्षणी दिवसाचा सगळा थकवा काही काळ विसरून गेलोअंधार लवकर पडू लागला होता, त्यामुळे शेवटच्या टप्प्यासाठी पूर्ण ताकद लावली आणि वेग वाढवत आडिवरेकडे निघालो. शेवटी रात्री साधारण :३० वाजता आडिवरे गाठलं. आडिवरेमध्ये माझ्या सासरच्या ओळखीच्या कुटुंबाकडे राहण्याची व्यवस्था होती. त्यांचं घर दाट झाडीत, अगदी पारंपरिक कोकणी पद्धतीचं होतं. घराबाहेर गोठ्यात गायी-म्हशी, सभोवताली शांतता आणि निसर्गत्या वातावरणाने पूर्ण दिवसाचा थकवा एका क्षणात कमी केला. त्यांनी अगदी घरच्या माणसासारखं स्वागत केलं. स्वादिष्ट कोकणी जेवण दिलं आणि पाहुणा म्हणून नव्हे तर कुटुंबातील सदस्य म्हणूनच वागवलं. १०० किमीच्या roller coaster राईडनंतर आता विश्रांती गरजेची होती. 



२३ डिसेंबर २०२५ - दिवस : आडिवरेगावखडीपावसरत्नागिरीगणपतीपुळे (70km)

चौथा दिवस म्हणजे कोकणातील सर्वात सुंदर टप्पा. सकाळी आडिवरेहून निघालो आणि किनारी मार्गाने प्रवास सुरू केला. आजचा दिवस खास होता, कारण अखेरचा टप्पा होता गणपतीपुळे. पण त्याआधी कोकण किनारपट्टीवरील अनेक सुंदर ठिकाणं अनुभवायची होती. सकाळच्या शांत वातावरणात सायकल चालवत काही वेळातच गावखडीला पोहोचलो. हा या संपूर्ण टूरमधील पहिला समुद्रकिनारा होता. समोर दिसणारा अथांग समुद्र, किनाऱ्यावरची शांतता आणि सकाळचा गार वारा मनाला खूप सुखावून गेला. तिथे थोडा वेळ थांबून फोटो घेतले आणि पुन्हा प्रवास सुरू केला.


कोकणातील किनारी भागात सायकलिंग म्हणजे सतत endurance ची परीक्षा असते. कारण जवळपास प्रत्येक समुद्रकिनारा किंवा गाव हे डोंगरांच्या मध्ये वसलेलं असतं. त्यामुळे सतत घाट चढणं आणि उतरवणं सुरूच असतं. प्रत्येक चढ दमवणारा, पण प्रत्येक उतार आणि समोर दिसणारा समुद्र पुन्हा ऊर्जा देणारा होता.

पावसच्या दिशेने जाताना एका प्रसिद्ध ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलोश्री दत्ता उपहारगृह, ज्यालाभटाची मिसळम्हणूनही ओळखलं जातं. गरमागरम आणि झणझणीत मिसळ खरोखर अप्रतिम होती. गोलप घाट चढायच्या आधी असा नाश्ता अगदी गरजेचा होता. मिसळ आणि चहामुळे पुन्हा शरीरात ऊर्जा आली आणि मग गोलप घाटाची चढाई सुरू केली. घाट चढून वर आल्यानंतर लागलेला सपाट भूभागामुळे जरा सायकल चालवायला बरे वाटले. 

आजचा मुख्य उद्देश वेग किंवा अंतर नसून कोकण किनारपट्टीचा निसर्ग मनापासून अनुभवणं हा होता. त्यामुळे मध्ये मध्ये थांबत, फोटो घेत आणि शांतपणे प्रवास सुरू ठेवला. रत्नागिरीमध्ये श्री पतित पावन मंदिराजवळ थोडा वेळ विश्रांती घेतली. रत्नागिरी शहराच्या हृदयस्थानी वसलेलं पतित पावन मंदिरात गेलो. हे केवळ धार्मिकच नाही, तर ऐतिहासिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचं ठिकाण आहे. या मंदिराचा उद्देश अस्पृश्यता निर्मूलन आणि समाजातील प्रत्येकाला एकत्र आणणं असा होता. मंदिराचं बांधकाम साधं, पण त्यातील शांतता आणि श्रद्धेचा भाव भावतो. मंदिराचा परिसर स्वच्छ आणि शांत आहे, जे एक मानसिक समाधान देते. वीर सावरकरांनी या मंदिराला विशेष महत्त्व दिलं होतं, म्हणूनच इथं त्यांच्या स्मृतींना उजाळा दिलाय तर छोटे पण सुंदर असे प्रदर्शन आहे ज्यात आपल्या महान क्रांतिकारकांची माहिती तर सावरकरांच्या काही वस्तू पाहायला मिळतात. इथे रत्नागिरी सायकलिंग क्लबमधील सायकलिस्ट राकेश हेरंबे यांची भेट झाली. सायकलिंग, कोकणातील सायकलिंगचे अनुभव आणि माझ्या कोकणातील टूरचे अनुभव यावर आमच्या छान गप्पा रंगल्या. सायकलिंगमुळे अनोळखी लोकांशीही सहज connection तयार होतं, हे पुन्हा एकदा जाणवलं.


पुरेशी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि काही वेळातच कोकणातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी  एकआरे- वारे बीच येथे पोहोचलो. समोर दिसणारा समुद्र, डोंगर आणि वळणावळणाचा रस्ता हे दृश्य नेहमीप्रमाणेच मन मोहून टाकणारं होतं. तिथे एका छोट्या  स्टॉलवर नाश्ता केला. विशेष म्हणजे, २०२४ च्या टूरमध्येही मी याच ठिकाणी थांबलो होतो आणि आश्चर्य म्हणजे स्टॉलच्या मालकाने मला ओळखलं. त्यानंतर काज़ीरभाटी, भांडारपुळे यांसारखे सुंदर समुद्रकिनारे पार करत शेवटी दुपारी साधारण :३० वाजता गणपतीपुळे गाठलं. गणपतीपुळेमध्ये पोहोचल्यानंतर सर्वप्रथम सायकल सुरक्षित ठिकाणी पार्क केली आणि श्री गणपतीचं दर्शन घेतलं. सलग दुसऱ्या वर्षी सायकलवरून गणपतीपुळेला पोहोचल्याची भावना शब्दांत सांगणं कठीण होतं. संपूर्ण प्रवास, आलेले चढ-उतार, थकवा, निसर्ग आणि अनुभव सगळं त्या एका क्षणी सार्थक झाल्यासारखं वाटलं.


दर्शनानंतर हॉटेलमध्ये check-in करून काही वेळ आराम केला. संध्याकाळी जवळच्या स्थानिक हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो आणि नंतर समुद्रकिनाऱ्यावर शांत फेरफटका मारला. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि रात्रीचं शांत वातावरण मनाला खूप शांत करून गेलं. रात्री साधारण ११ वाजता झोपलोआता पुढे सायकलिंगचा कोणताही प्लॅन नव्हता. परतीचा प्रवास गणपतीपुळेहून पुण्याला बसने करायचा होता, जी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साधारण वाजता होती.



२४ डिसेंबर २०२५ - दिवस : गणपती दर्शनमालगुंड परिसरपुण्याकडे परतीचा प्रवास

पाचव्या दिवशी सकाळची सुरुवात अगदी शांत आणि प्रसन्न वातावरणात झाली. पहाटे लवकर उठून सर्वप्रथम श्री गणपतीचं दर्शन घेतलं. सकाळच्या वेळेतील मंदिर परिसरातील शांतता, मंद घंटानाद आणि समुद्राकडून येणारा गार वारा मनाला खूप समाधान देणारा होता. सलग काही दिवसांच्या सायकलिंगनंतर आजचा दिवस पूर्णपणे आरामदायी आणि निवांत ठेवायचं ठरवलं होतं. दर्शनानंतर हलक्या फुलक्या राईडला सुरुवात केली. आज कोणतंही मोठं अंतर पार करायचं नव्हतं, फक्त गणपतीपुळे परिसर शांतपणे अनुभवायचा होता. सकाळच्या थंड हवेत समुद्रकिनाऱ्यालगत सायकल चालवत समाधान हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलो. गरमागरम नाश्ता आणि कॉफी घेत दिवसाची सुरुवात अजूनच छान झाली.


त्यानंतर कवि केशवसुत स्मारकाला भेट दिली. मराठी साहित्यातील महत्त्वाच्या कवींच्या आठवणी जपणारं हे ठिकाण शांत आणि प्रेरणादायी वाटलं. पुढे मालगुंड बीचकडे सायकलिंग करत गेलो. सकाळच्या वेळेतील समुद्रकिनाऱ्याची शांतता, किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा आणि मोकळा वारा मनाला खूप refreshing वाटत होता. मालगुंडहून पुढे खारवीवाडा पुलाकडे गेलो. पुलावरून दिसणारं कोकणातील गावांचं दृश्य खूप सुंदर होत. मध्ये मध्ये थांबत फोटो घेत आणि निवांतपणे सायकलिंग करत साधारण १५-२० किमीची छोटी राईड पूर्ण करून पुन्हा गणपतीपुळ्यात परतलो.


गणपतीपुळे मंदिर परिसरात त्या दिवशी प्रदर्शन भरलं होतं. स्थानिक वस्तू, कोकणी पदार्थ, घरगुती बनवलेले खाद्यपदार्थ आणि विविध स्टॉल्स यामुळे परिसरात छान उत्साहाचं वातावरण होतं. अनेक स्थानिक वस्तू पाहत फेरफटका मारला. दुपारचं जेवणही प्रदर्शनातील स्टॉलमध्येच केलं. कोकणी चव असलेलं साधं पण स्वादिष्ट जेवण खूप आवडलं.

दुपारनंतर हॉटेलवर परत येऊन आराम केला. सलग काही दिवसांच्या सायकलिंगनंतर शरीरालाही विश्रांतीची गरज होती. त्यामुळे उरलेला दिवस पूर्णपणे निवांत घालवला आणि आतापर्यंतच्या संपूर्ण प्रवासाच्या आठवणी मनात पुन्हा अनुभवत शांतपणे वेळ घालवला. गणपतीपुळेहून पुण्याला परतीचा प्रवास स्लीपर बसने केला. सायकल सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करून आरामात प्रवास केला. प्रवास संपला असला, तरी मन मात्र अजूनही त्या रमणीय ठिकाणी अडकून पडलं होतं.


हा प्रवास मला खूप काही शिकवून गेला. एकट्याने प्रवास करणं म्हणजे स्वतःशी संवाद साधणं. प्रत्येक अडचण, प्रत्येक थकवा आणि प्रत्येक आनंदसगळं स्वतः अनुभवणं. सायकलिंगमुळे मला निसर्गाच्या अधिक जवळ जाण्याची संधी मिळाली. सह्याद्रीचे घाट, कोकणाचा समुद्र, आणि गावांचं साधं जीवनसगळं मनात कोरलं गेलं.

No comments:

Post a Comment