२०२३ डिसेंबरमध्ये एकट्याने अष्टविनायक सायकलवर पूर्ण केले व त्यानंतर मला सायकलवर गणपतीपुळेच्या गणेशाच्या दर्शनाची ओढ लागली होती. २०२४ डिसेंबरचा मुहूर्त ठरला. पुण्यापासून रत्नागिरीपर्यंतचा हा 4 दिवसांचा सोलो सायकलिंग प्रवास माझ्या आयुष्यातील एक खास अनुभव ठरला. सह्याद्रीच्या डोंगररांगा, निसर्गरम्य घाटवाटा, समुद्रकिनारे, आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील साधेपणाने मन भारावून गेले. सायकलिंग हा स्वतःशी संवाद साधण्याचा आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा मार्ग आहे.
पहिला दिवस: पुणे ते लाटवण (१५८ किमी)पहिल्या दिवशी प्रवासाची सुरुवात पुण्याहून पहाटे ६ वाजता झाली. सकाळच्या थंडगार वातावरणात सायकलिंगला सुरुवात करताना मनात एक प्रकारचा उत्साह होता. हलके चढ उतार असले तरी सकाळच्या थंडीत अंतर वेगाने कापले जात होते. ताम्हिणी घाट ओलांडताना धुक्याने झाकलेले रस्ते आणि आजूबाजूचा निसर्ग एखाद्या पोस्टकार्डसारखा वाटत होता. रस्त्याने झऱ्यांचा आवाज, पक्ष्यांचे किलबिल, आणि समोर येणारे उंच डोंगर मनाला एक वेगळाच आनंद देत होते. ताम्हिणीच्या चढ-उतारांनी शरीराची चांगलीच परीक्षा घेतली, पण या सौंदर्याने थकवा कमी झाला.
At Tamhini |
ताम्हिणी उतार सुरु होण्याआधी एका ठिकाणी नाश्ता व कॉफी घेऊन मग ताम्हिणी उतरलो. पुढील सरळ रस्ता सहज पार करून माणगावला १२ वाजता जेवण केले. आता थंडी जाऊन ऊन जाणवू लागले होते. माणगाव ते महाड हे ३०km चे अंतर जरी सुंदर व प्रशस्थ अश्या मुंबई-गोवा महामार्गवर असले तरी उन्हाचा सामना करताना अंतर अधीक वाटत होते. महाडच्या आधी मुंबई BRM (म्हणजे लांब पल्ल्याची सायकलिंग ज्याला 200, 300, 400, 600 आणि 1000 किमीच्या राईड्ससह Brevets de Randonneurs Mondiaux (BRMs) म्हणतात. सायकल चालवण्याची ही शैली अ-स्पर्धात्मक आहे आणि प्रत्येक अंतराकरता वेळ दिली जाते ज्याच्या आत ते पूर्ण करणे बंधनकारक असते) चे प्रमुख अनिल उचिल भेटले. मी मुंबई मध्ये २०१७ ते २०१९ दरम्यान अनेक सायकल BRM Ride/race केल्याने ओळख होती. जरा वेळ गप्पा झाल्यावर मग मी पुढे मार्गस्थ झालो.
महाडला पोहोचल्यावर थोडासा विश्रांतीचा वेळ घेतला आणि पुढे प्रवास सुरू ठेवला. रस्त्यावर ग्रामीण भागातील गावं, त्यांच्या साध्या पण आत्मीयतेने भरलेल्या जीवनशैलीचं निरीक्षण करत सायकल चालवत होतो. दुपारनंतर प्रवास आणखी खडतर झाला, पण लाटवणजवळ पोहोचताच डोंगरांच्या मागे लपणारा सूर्य आणि थंड वारा यामुळे दिवसभराचा थकवा विसरायला झालं. आजचा मुक्काम लाटवणं अलीकडे घाट माथ्यावर असलेल्या निवांत नावाच्या हॉटेल मध्ये होता पण त्याआधी लाटवणंचा खडे चढण असलेला घाट पार करायचा होता. मुळात १५० km सायकल चालवून झाल्याने हा घाट अजूनच अवघड वाटू लागला. मजल दरमजल करत घाट संपवला व हॉटेलला check-In केले. एकदम साधे हॉटेल पण प्रशस्त कॉटेज रूम आणि शांतता मला पुरेशी होती. लांब पल्ल्याच्या सायकल प्रवासात गरम पाण्याने अंघोळ व कपडे धुणे हे न चुकणारी काम पार पडून साधे जेवण केले. उद्याच्या प्रवासाची तयारी करून 10 ला झोपलो.
Cycling at Latvan Ghat |
दुसरा दिवस: लाटवण ते गुहागर (८७ किमी):
सकाळी ६:३० वाजता लाटवणहून सुरुवात केली. सुरुवातीचे काही किलोमीटर चढण होते, पण सकाळच्या थंडगार वातावरणात पायाला दम जाणवला नाही. पहाटेच्या प्रकाशात डोंगरमाथ्यावरून दिसणाऱ्या सूर्याला नमस्कार करून प्रवासाला सुरुवात केली. लाटवणहून दापोलीकडे जाताना रस्त्याने लहान-मोठी खेडी, हिरवीगार शेती, आणि डोंगरदऱ्या दिसत होत्या. लाटवणहून साधारण ३३ किमी अंतरावर दापोली हा पहिला मोठा थांबा होता. येथे एका छोट्याशा हॉटेलमध्ये (आहार हॉटेल) उपमा आणि गरम कॉफी घेतली. दापोलीतील थोडक्याच विश्रांतीनंतर दाभोळ जेट्टीकडे प्रवास सुरू केला. सतत येणारे डोगरदऱ्यातील चढ भयानक दमवत होते पण शेवटी कोकण म्हणाले की आपसूक डोंगरातील घाट रस्ते आलेच. दाभोळ जेट्टीच्या अलीकडे प्रथमच समुद्राचे दर्शन झाले.
सकाळी ६:३० वाजता लाटवणहून सुरुवात केली. सुरुवातीचे काही किलोमीटर चढण होते, पण सकाळच्या थंडगार वातावरणात पायाला दम जाणवला नाही. पहाटेच्या प्रकाशात डोंगरमाथ्यावरून दिसणाऱ्या सूर्याला नमस्कार करून प्रवासाला सुरुवात केली. लाटवणहून दापोलीकडे जाताना रस्त्याने लहान-मोठी खेडी, हिरवीगार शेती, आणि डोंगरदऱ्या दिसत होत्या. लाटवणहून साधारण ३३ किमी अंतरावर दापोली हा पहिला मोठा थांबा होता. येथे एका छोट्याशा हॉटेलमध्ये (आहार हॉटेल) उपमा आणि गरम कॉफी घेतली. दापोलीतील थोडक्याच विश्रांतीनंतर दाभोळ जेट्टीकडे प्रवास सुरू केला. सतत येणारे डोगरदऱ्यातील चढ भयानक दमवत होते पण शेवटी कोकण म्हणाले की आपसूक डोंगरातील घाट रस्ते आलेच. दाभोळ जेट्टीच्या अलीकडे प्रथमच समुद्राचे दर्शन झाले.
Sunrise from Latvan Ghat |
Towards Dabhol Jetty |
जेट्टीला पोहोचलो व काही वेळातच फेरी मिळाली. दाभोळच्या फेरीचा अनुभव हा प्रवासाचा एक खास भाग होता. सायकलसह जेट्टीतून प्रवास करताना समुद्राच्या लाटांचा आवाज आणि आसपासची शांतता मनावर छाप पाडणारी होती. पुढे धोपवे ते गुहागर अंतर १७km होते. ४ पर्यंत पोहचल्यावर प्रथम दुपारचे जेवण केले व घरगुती राहण्याची जागा शोधली. लवकर फ्रेश होऊन मग वाडीमधून समुद्रकिनारा गाठला.
Dobhol Jetty |
Towards Guhagar |
गुहागरचा समुद्रकिनारा हा गावाचं मुख्य आकर्षण आहे. पांढऱ्या वाळूचा स्वच्छ किनारा, नारळाच्या झाडांची रांग, आणि समुद्राच्या लाटा यामुळे इथं आल्हाददायक वातावरण आहे. सायंकाळच्या वेळी सूर्यास्त पाहणं हा इथला खास अनुभव असतो. समुद्रकिनाऱ्यावर चालताना जाणवणारा गार वारा आणि लाटांचा नाद तुम्हाला ताजेतवाने करून जातो. गुहागर समुद्रकिनाऱ्यावर पोहोचल्यानंतर संध्याकाळी सूर्यास्त पाहण्याचा अनुभव अप्रतिम होता. समुद्रकिनारी काही वेळ शांततेत सूर्याला निरोप देणं, हे खरंच वेगळं समाधान देणारं होतं.
Sunset from Guhagar |
रात्री जोग आजीची खानावळला जाऊन पोटभर चविष्ट कोकणी पद्धतीचं जेवण केले. दिवसभरच्या अथक श्रमानंतर मस्त गरम घरगुती जेवणाने शांत झोप लागली.
तिसरा दिवस: गुहागर - वेळणेश्वर - हेदवी - गणपतीपुळे (७० किमी):
तिसऱ्या दिवशीचा प्रवास जरा चढ-उतारांनी भरलेला होता, पण निसर्गाची साथ होतीच. सकाळी ६:३० ला सायकलला पायडल मारले. एवढ्या सकाळी कोणतेच दुकान उघडले नसल्याने सोबत आणलेले ड्राय फ्रुट खाल्ले. वाटेत उर्फाटा गणपती मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. हे गणपती मंदिर अगदी समुद्रकिनाऱ्यालगत वसलेलं असून, उर्फाटा गणपतीला समुद्राच्या लाटांपासून गावाचं रक्षण करणारा देव मानलं जातं. या मंदिराचा इतिहास शेकडो वर्षांपूर्वीचा असून, स्थानिक लोकांमध्ये गणपतीच्या चमत्कारीक शक्तींबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. असं मानलं जातं की, वादळ आणि पुराच्या संकटांमध्ये उर्फाटा गणपतीने गावाचं रक्षण केलं आहे.
तिसरा दिवस: गुहागर - वेळणेश्वर - हेदवी - गणपतीपुळे (७० किमी):
तिसऱ्या दिवशीचा प्रवास जरा चढ-उतारांनी भरलेला होता, पण निसर्गाची साथ होतीच. सकाळी ६:३० ला सायकलला पायडल मारले. एवढ्या सकाळी कोणतेच दुकान उघडले नसल्याने सोबत आणलेले ड्राय फ्रुट खाल्ले. वाटेत उर्फाटा गणपती मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. हे गणपती मंदिर अगदी समुद्रकिनाऱ्यालगत वसलेलं असून, उर्फाटा गणपतीला समुद्राच्या लाटांपासून गावाचं रक्षण करणारा देव मानलं जातं. या मंदिराचा इतिहास शेकडो वर्षांपूर्वीचा असून, स्थानिक लोकांमध्ये गणपतीच्या चमत्कारीक शक्तींबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. असं मानलं जातं की, वादळ आणि पुराच्या संकटांमध्ये उर्फाटा गणपतीने गावाचं रक्षण केलं आहे.
Guhagar Beach |
पुढे श्री व्याडेश्वर मंदिरात दर्शनाला गेलो. गुहागरचं श्री व्याडेश्वर मंदिर हे गावातील सर्वात पुरातन आणि महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे. या मंदिराला शिवमंदिराचा दर्जा असून, हे भगवान शिवचं स्थान मानलं जातं. असं मानलं जातं की या ठिकाणी प्राचीन काळात ऋषी व्याड यांनी तपस्या केली होती, आणि त्यांच्याच नावावरून या मंदिराला व्याडेश्वर हे नाव पडलं. श्री व्याडेश्वर मंदिराचं स्थापत्य पारंपरिक कोकणी शैलीत बांधलेलं आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान शिवाची पिंडी आहे, ज्याभोवती नक्षीदार कोरीवकाम केलं आहे. मंदिराचं छत आणि भिंतींवर प्राचीन काळातील धार्मिक प्रसंगांचे सुंदर कोरीवकाम दिसून येतं. मंदिराचा मुख्य सभामंडप प्रशस्त असून, तिथे भक्तांना बसून ध्यान आणि पूजा करता येते. दीपमाळा, म्हणजेच दगडात कोरलेला दीपस्तंभ, हा मंदिराच्या आवारातील एक महत्त्वाचा भाग आहे.
Somewhere in Kokan |
पुढे गुहागरजवळील घाट चढून पालशेत कडे निघालो. पालशेत हे कोकणातील एक निसर्गरम्य गाव असून इथले श्री दत्त मंदिर अत्यंत पुरातन मानले जाते. या मंदिराची स्थापना साधारणतः १७व्या शतकात झाल्याचे सांगितले जाते. दत्तात्रेय हे त्रिमूर्तींचे रूप असून, ब्रह्मा, विष्णू, आणि महेश या तीन देवतांचे गुण त्यांच्यात सामावलेले आहेत. मंदिराच्या परिसरात प्राचीन वटवृक्ष आहे, जो धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व राखतो. मंदिर परिसरात वार्षिक दत्त जयंती उत्सव साजरा होतो. मी पोहचलो तेव्हा मंदिरात दत्त जयंती उत्सवनिमित्त १०२ वर्ष गारायण सप्ताह चालू होता. १९२०-१९२२ दरम्यान कोकणात आलेल्या भयानक प्लेग साथीमुळे पालशेत गावातील लोकांनी दत्तला गारायण केले की कोणी गावात दगावू नये व विघ्न आले नाही तेव्हा पासून दर वर्षी दत्त जयंतीला ७ दिवस २४ तास नामसप्ताह चालू राहतो. गावात कॉफी करता थांबलो होतो तेव्हा गावातील लोकांनी आग्रहाने मंदिरात दर्शनाला आमंत्रण केले. या आधी पण मी या मंदिराला भेट दिली आहे पण आताच वातावरणच निराळे होते.
Palshet Datta Temple |
दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ झालो. जरा वाट सोडून मी वेळेनेश्वरच्या शिव मंदिरात गेलो. डोगरावरून एकदम समुद्रसपाटीला छान उतार मिळाला पण परतीच्या वेळेस हा भयाण चढ पोटात गोळा आणणार होता. श्री वेळणेश्वर मंदिर हे कोकणातील एक सुप्रसिद्ध शिवमंदिर आहे. या मंदिराचा इतिहास १००० वर्षांहून अधिक जुना आहे. असे मानले जाते की, यादव राजवटीच्या काळात या मंदिराचा विस्तार करण्यात आला होता. वेळणेश्वर नावाचा अर्थच “वेळाचा ईश्वर” असा होतो, ज्याचा अर्थ आहे की भगवान शंकर हे वेळेचे अधिपती आहेत. वेळणेश्वर मंदिर पारंपरिक कोकणी शैलीत बांधलेले असून, मंदिराचा गाभारा भव्य आणि शांत आहे. छतावर आणि भिंतींवर कोरलेली नक्षी ही यादवकाळातील कोरीव कामाचे उदाहरण आहे. मंदिराच्या मुख्य मंडपात एक मोठा नंदीमहाराजाची मूर्ती आहे, जी काळ्या पाषाणात कोरलेली आहे. मंदिराच्या भोवती प्रशस्त सभामंडप आहे, जिथे भक्त पूजा आणि ध्यानासाठी बसतात. मंदिराच्या प्रांगणात एक मोठा दीपस्तंभ आहे, जो रात्रीच्या वेळी प्रज्वलित होतो. हे दृश्य अत्यंत भव्य आणि दिव्य वाटते. इथला समुद्रकिनारा सुंदर आहे पण चढत ऊन पाहून मी लांबून दर्शन घेतले व पोटभर नाश्ता करून निघालो. अंगावर येणार चढ चढून मग पुढे तवसाळ जेट्टीकडे निघालो.
At Velaneshwar Temple |
वाटेत हेदवीला गणेश मंदिर आहे तिथे दर्शनकारात थांबलो. या मंदिराला दशभुजा गणेश मंदिर म्हणतात. मंदिराचा इतिहास साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीज आक्रमणांच्या काळात आहे. असे मानले जाते की, या गणपतीची मूर्ती एका साधूने शोधून भक्तांसाठी स्थापन केली. हेदवीचे गणेश मंदिर दशभुजा (दहा हात असलेल्या) गणपतीसाठी प्रसिद्ध आहे. ही मूर्ती एकाच काळ्या पाषाणात कोरलेली असून, तिचा आकार साधारणतः तीन फूट उंच आहे. मूर्तीवर दिसणारे दहा हात हे गणपतीच्या विविध शक्तींचे प्रतीक आहेत. मंदिराची वास्तुकला साधी आणि आकर्षक आहे. गाभाऱ्यातील शांतता भक्तांच्या मनाला प्रसन्नता देते. मंदिराचा सभामंडप लाकडाचा असून, त्यावर कोरलेले नक्षीकाम अप्रतिम आहे.
Jaigad Jetty |
यानंतर मग मी जेट्टी गाठली. पुढील बोट तासाने असल्याने छान विश्रांती मिळाली. इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांनी माझ्याशी गप्पा मारत माझ्या या प्रवासाबद्दल चौकशी केली व एकटा सायकल प्रवास करतो म्हणून कौतुक केले. फेरीबोट आल्यावर पलीकडे जयगड जेट्टीला पोहोचलो. खाडीतून वाहणारी गार हवा व अथांग समुद्र मन प्रसन्न करते. जयगड जेट्टीपासून पुढील रस्ता खूपच सुंदर होता. रस्त्यावरून दिसणारे नारळाच्या झाडांचे ताटवे, समुद्राचे दर्शन, आणि हिरव्या डोंगररांगा यामुळे सायकलिंग अधिक रोमांचक वाटत होतं. जेट्टी ओलांडल्यानंतर गणपतीपुळेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. गणपतीपुळे पोहोचल्यानंतर श्री गणपतीच्या दर्शनाने मन शांत झालं. या ठिकाणी असलेली भक्तीमय आणि प्रसन्न वातावरण मनाला वेगळाच अनुभव देतं. मनातली इच्छा पूर्ण झाली. पुजार्यांनी पण सायकलवर इथपर्यंत आलो म्हणून कौतुक केले.
Solo cycling - Ganapatipule Temple |
पुढे जरा वेळ समुद्रकिनाऱ्यावर बसून वेळ घालवला. थोडी पेटपूजा करून मग हॉटेल शोधले व फ्रेश झालो. रात्री मार्केट परिसरात चक्कर मारून जेवण केले व वेळेत झोपलो. खऱ्या अर्थाने माझी सायकलवारी पूर्ण झाली होती तर उद्या रत्नागिरीमार्ग पावस, गणेशगुळे व रत्नागिरीला पोहचायचे होते.
चौथा दिवस: गणपतीपुळे ते रत्नागिरी (७५ किमी):
प्रवासाच्या शेवटच्या दिवशी गणपतीपुळ्याहून रत्नागिरीच्या दिशेने प्रस्थान केलं. या दिवशीचा रस्ता एकदम वेगळ्या प्रकारचा होता – समुद्राच्या अगदी जवळून जाणारा. वाटेत लागणाऱ्या छोट्या गावांमधील लोकांचे साधेपण आणि आपुलकीने भरलेल्या संवादाने प्रवास अधिक सुखकर झाला. गणपतीपुळेपासून केवळ ३ किमी अंतरावर असलेला भंडारपुळे बीच हा कोकणातील एक अप्रतिम किनारा. सायकलने भंडारपुळे किनाऱ्यापर्यंत जाणं हा एक सुखद अनुभव आहे. डोंगरातून जाणारा रस्ता आणि समुद्राचं मधून मधून डोकावणारं दृश्य यामुळे प्रवास अधिक रोमांचक होता.
Aare-Ware Beach |
भंडारपुळे पार केल्यानंतर साधारण ८ किमी अंतरावर आरे आणि वारे हे जुळे किनारे आले. हे किनारे त्यांच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. आरे-वेरे किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी वळणदार रस्ता आणि समुद्राचं नयनरम्य दृश्य अनुभवायला मिळतं. सायकल चालवताना या भागातला गारवा आणि समोर दिसणाऱ्या समुद्राच्या निळ्या छटा मन मोहून टाकतात. आरे-वारे मधील समुद्रालगत असलेला रस्ता तर सर्वांनाच भुरळ पाडतात.
Ware Beach |
तिथल्या एका खाण्याच्या टपरीवर अथांग समुद्र पाहत नाश्ता व कॉफी घेतली. स्थानिक व तिथे आलेल्या पर्यटकांशी गप्पा मारून पुढे निघालो. काही अंतर पार करून मग रत्नगिरीमध्ये प्रवेश केला. रत्नागिरी शहराच्या हृदयस्थानी वसलेलं पतित पावन मंदिरात गेलो. हे केवळ धार्मिकच नाही, तर ऐतिहासिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचं ठिकाण आहे. या मंदिराचा उद्देश अस्पृश्यता निर्मूलन आणि समाजातील प्रत्येकाला एकत्र आणणं असा होता. मंदिराचं बांधकाम साधं, पण त्यातील शांतता आणि श्रद्धेचा भाव भावतो. मंदिराचा परिसर स्वच्छ आणि शांत आहे, जे एक मानसिक समाधान देते. वीर सावरकरांनी या मंदिराला विशेष महत्त्व दिलं होतं, म्हणूनच इथं त्यांच्या स्मृतींना उजाळा दिलाय तर छोटे पण सुंदर असे प्रदर्शन आहे ज्यात आपल्या महान क्रांतिकारकांची माहिती तर सावरकरांच्या काही वस्तू पाहायला मिळतात. मंदिरात दर्शन घेऊन सायकल प्रवासाला सुरूवात करणं म्हणजे मानसिक उर्जेचा साठा घेऊन पुढं निघणं.
Patit Pavan Temple, Ratnagiri |
रत्नागिरीपासून पावसपर्यंतचा १६ किमीचा रस्ता हा सायकलसाठी परिपूर्ण आहे. डोंगर-दऱ्यांचा सोबतीने, नारळ आणि सुपारीच्या झाडांनी व्यापलेला हा रस्ता अत्यंत मनमोहक आहे. दुपारी १:३० च्या सुमारास पावस गाठले. पावस हे गाव मुख्यतः स्वामी स्वरूपानंद यांच्या आश्रमामुळे प्रसिद्ध आहे. हे गाव निसर्गसंपन्न असून, इथलं शांत वातावरण एक वेगळाच अनुभव देतं. स्वामी स्वरूपानंद हे आधुनिक काळातील प्रसिद्ध संत होते. त्यांच्या शिकवणींनी आणि आध्यात्मिक विचारांनी अनेक लोकांना प्रेरणा दिली आहे. त्यांचा आश्रम हे एका प्रकारचं ध्यानकेंद्र आहे. स्वामी स्वरूपानंद यांचं साहित्य, त्यांच्या शिकवणींवर आधारित ग्रंथ, आणि इतर आध्यात्मिक पुस्तकं इथं वाचायला मिळतात. जेवणाची वेळ असल्याने प्रसाद म्हणून मिळणारी खिचडी खाऊन मग बाहेर पडलो.
At Pawas Temple |
गणेशगुळे हे माझ्या आवडत्या ठिकाणांपैकी एक जागा. मला गणेशगुळेच्या गणेश मंदिर व त्याच्या आसपासचा परिसर , शांतात खूप भावतो. या मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीगणेशाची मूर्ती नसून मध्यभागी असलेल्या ६ फूट उंचीच्या भल्यामोठ्या शिळेस स्वयंभू गणपती असल्याचे मानले जाते. फार पूर्वी गणपतीच्या नाभीतून अर्थात या स्वयंभू शिळेमधून पाण्याची संततधार वाहत असे. काही नैसर्गिक कारणांनी एके दिवशी हे पाणी अचानक बंद झाले. तेव्हापासून देवाने गणेशगुळ्याहून गणपतीपुळ्याला स्थलांतर केले अशी आख्यायिका प्रचलित झाली. उंचावर असलेल्या मंदिराच्या समोरच्या भागात खोल दरी आणि हिरव्यागार वनसंपदेने नटलेले सौंदर्य नजरेत भरते.
Ganeshgule Ganesh Temple |
मंदिराजवळ, कथित पांडव काळातील एक प्राचीन ७० फूट खोल विहीर आहे. बऱ्यापैकी खोल आहे पण तळापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दर्शन व विश्रांती नंतर मग रत्नगिरीकडे सायकलिंग चालू केले. वाटेत भाट्ये बीच वर जरा वेळ थांबलो आणि रत्नगिरीत पोहोचलो. शेवटी रत्नागिरीत पोहोचल्यावर त्या क्षणी मनात समाधान होतं – चार दिवसांचा प्रवास, निसर्गाचा आणि स्वतःचा शोध, आणि एक नवीन अनुभव घेऊन मी घरी परतणार होतो. माझ्या सासरच्या नात्यातल्यानकडे जाऊन फ्रेश झालो व त्यांनी छान केलेल्या घरगुती जेवणाचा आस्वाद घेतला. रत्नागिरीहून पुण्याला परतीचा प्रवास स्लीपर बसने केला. सायकल सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करून आरामात प्रवास केला. प्रवास संपला असला, तरी मन मात्र अजूनही त्या रमणीय ठिकाणी अडकून पडलं होतं.
At Lokmanya Tilak Birthplace... End of 4 days Solo Cycling Tour |
माझ्यासाठी हा प्रवास फक्त एक आठवण नाही, तर प्रेरणा देणारा अनुभव ठरला आहे.
At Palshet |
Ganapati Bappa Moraya |
प्रितेश कुलकर्णी